स्थानिक संस्था करापोटी १२ कोटी ५५ लाख रुपये कर न भरल्यामुळे मे. भारती एअरटेल ली.कंपनीची नौपाडा प्रभाग समिती कार्यालया शेजारील गॅलरीची स्थावर व जंगम मालमत्ता आज ठाणे महापालिकेने जप्त केली. मे.भारती एअरटेल लि.यांच्याकडून सन २०१३ – १४ पासून स्थानिक संस्था करापोटी १२ कोटी ५५ लाख रुपये रक्कम थकबाकी आहे.महापालिकेने थकीत रक्कम भरण्यासाठी कंपनीला वारंवार नोटीसा बजावून देखील त्यांनी थकीत रक्कम न भरल्यामुळे महापालिकेने आज ही कारवाई केली. स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील सर्व आस्थापनांचे सन २०१३-१४ पासून थकीत स्थानिक संस्था कराच्या वसुलीची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून अशा पद्धतीची कारवाई पालिकेकडून यापुढेही सुरु ठेवण्यात येणार आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक श्री.आपटे तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान स्थानिक संस्था करासाठी नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांपैकी ज्या आस्थापनांनी सन २०१३ -१४ पासून त्यांची विवरणपत्रे दाखल केली नसतील किंवा त्यांची विवरणपत्रे दाखल करून आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नसतील अशा आस्थापनांनी त्यांची विवरणपत्रे व कर निर्धारणेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करून सन २०१३-१४ पासूनची कर निर्धारणा पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन महापालिकेने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here