उंबरमाळी रेल्वे स्थानकात पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन रुळावरुन घसरल्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळपासून कसारा स्थानकातून एकही लोकल न सुटल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. लांब पल्ल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून इगतपूरीपर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या आहेत. मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन उंबरमाळी स्थानकात रुळावरून घसरली. पहाटेपासून रुळावरुन घसरलेली व्हॅन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या दरम्यानच मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या. सकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे कसारा स्थानकातून एकही लोकल सोडण्यात आली नाही. त्यामुळे कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.संतापलेल्या प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको करत मध्य रेल्वेविरोधात रोष व्यक्त केला. या रेल रोको आंदोलनामुळे टिटवाळा येथून लोकल वाहतूक सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here