सध्याच्या काळात रुग्ण आणि डॉक्टरांतील दरी काहीशी वाढत चालल्याचे दिसत असतानाच इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण मात्र ती कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 27 वर्षांपासून ‘डॉक्टर्स डे’ निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून त्यात स्वतः सर्व डॉक्टर सहभागी होत असल्याची माहिती कल्याण ‘आयएमए’चे सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांप्रती उपचार करण्याबरोबरच चांगली सेवा देण्याची आमचीही जबाबदारी आहे. याच जाणीवेतून आम्ही दरवर्षी हे रक्तदान शिबिर घेत असतो. ज्यामध्ये डॉक्टरांसह महाविद्यावयीन विद्यार्थी, नामांकित उद्योगपती, वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह सुमारे 210 जणांनी यावेळी रक्तदान केले. या शिबिरात जमा होणारे सर्व रक्त आम्ही कल्याणातील रुख्मिणीबाई रुग्णालयातील अर्पण ब्लड बँकेला देतो जेणेकरून कल्याण डोंबिवली परिसरातील गरजू व्यक्तींना ते उपलब्ध होऊ शकेल असेही डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान कल्याणातील नामांकित आणि 62 वर्षीय ज्येष्ठ ईएनटी तज्ञ डॉ. बालिगा यांनी आतापर्यंत तब्बल 120 वेळा रक्तदान केल्याबद्दल यावेळी सन्मान करण्यात आल्याचे कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. प्रदीप सांगळे यांनी सांगितले. एकीकडे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नकारात्मक चित्र बदलण्यासाठी कल्याण ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here