परळी – आज सोमवारी पहाटे परळी शहरातील मोंढा भागात लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने भस्मसात होऊन अंदाजे २५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास स्टेशन रोडवरील सरदारजी सायकल मार्ट च्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात सकाळी ही आग लागली होती बघता बघता आग बाजूच्या दुकानात पसरली. आग लागल्याचे समजताच नगरपालिकेची अग्निशमन गाडी दाखल झाली तिने आग विझवायला सुरुवात केली. मात्र आगीचा आगीचे लोळ जास्त असल्याने नगरपालिकेसह इतर अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. आज सकाळी रिमझीम पावसाच्या सरी आल्या पण तोपर्यंत उशीर झाला होता. काही वेळाने वैद्यनाथ साखर कारखाना आणि परळी थर्मल पॉवर स्टेशनचा आणखी एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोवर मात्र उशीर झाला होता तीन दुकानातील सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. इलेक्ट्रिक दुकानात लागलेल्या आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.काही अनर्थ होऊ नये यासाठी परिसरातील संपूर्ण वीज बंद करण्यात आलेली होती यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी सकाळी साडेपाच पासून घटनास्थळी ठाण मांडून होते.आगीचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमा झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here