तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेक (OPEC) ने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. ओपेकच्या या निर्णयामुळे कच्च्या तेलाची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलहून अधिक झाली आहे. अमेरिकेने घातलेल्या बंदीनंतर इराणकडून होणारा तेल पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इराणकडून कमी पुरवठा झाला म्हणून इतर देश तेल उत्पादन वाढवणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय रशियाच्या नेतृत्वाखाली तेल उत्पादक आणि निर्यात करणाऱ्या देशांनी घेतला. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत २ डॉलर प्रति बॅरलने वाढून ती ८१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.तेलाच्या पुरवठ्यासंबंधी सध्या कोणतीही समस्या नाही. उत्पादनात अतिरिक्त नफा कमावण्याचीही गरज नाही. सर्व देशांना गरजेपुरते कच्चे तेल मिळत आहे, असे सौदी अरेबियाकडून सांगण्यात आले आहे. तेलाच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी उत्पादन वाढवण्याची मागणी करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ओपेकचा हा निर्णय जोरदार धक्का आहे, असे मानले जात आहे. ख्रिसमसपर्यंत कच्चा तेलाच्या किंमती ९० डॉलर प्रति बॅरल आणि २०१९ च्या जानेवारीच्या महिन्यात १०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here