मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे घोंगडे गेले अनेक महिने भिजत पडले असतानाच आता पितृ पंधरवड्यानंतर शेवटचा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा मुहूर्त ठरवला जात आहे. कोणत्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी करायची हे ठरविण्यासाठी मंत्र्यांनी आपापल्या खात्यांमध्ये गेल्या चार वर्षांत काय काम केले, कोणते निर्णय घेतले, याबाबतची झाडाझडती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या सोमवारी प्रत्येक मंत्र्याला आपल्या खात्याचे निर्णय, त्यांची अंमलबजावणी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार असून, कोणाची गच्छंती होणार याबाबत निर्णय त्यानंतरच होणार आहे. राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारला ऑक्टोबरमध्ये चार वर्षे पूर्ण होत आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघे पाच महिने उरले आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरमध्ये मुंबईत सुरू होणार आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नवरात्रौत्सवाचा मुहूर्त शोधण्यात आल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत. त्यांनीही मंत्रिमंडळ विस्ताराला होकार दिला आहे. ते मुंबईत परतल्यानंतर विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येते. या शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरवले असल्याचेही बोलले जाते.भाजपची काही मंत्रिपदे रिक्त आहेत. तसेच, काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय व जातीय समीकरणे समोर ठेवून विस्तार होईल, असे कळते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here