ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्य्राचा डोंगर परिसर येत असला तरी हा डोंगर वन विभागाच्या अखत्यारीत येतो. डोंगराचे अस्तित्व धोक्यात; महापालिकेचे वन विभागाकडे बोट मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पारसिक रेतीबंदर येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे वाढली असताना, आता मार्गिकेच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरही बेकायदा झोपडय़ा उभ्या राहत आहेत. या झोपडय़ा उभारण्यात स्थानिक गुंडांच्या टोळ्या कार्यरत असून त्यांच्याकडून एका झोपडीची दीड लाखाला विक्री केली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. हा वन विभागाच्या हद्दीतील परिसर असल्याचा दावा करीत महापालिकेने हात झटकले आहेत. उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग महत्त्वाचा मानला जातो. मुंब्रा शहरालगत असलेल्या डोंगरातून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. डोंगराच्या मधोमध हा वळणरस्ता तयार करण्यात आला आहे. त्याला खेटूनच गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. पारसिक रेतीबंदर येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या डाव्या बाजूला असलेल्या डोंगरउतारावर ही बांधकामे उभी राहिली आहेत. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अवजड वाहन या बेकायदा वस्तीवर उलटल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. गेल्या वर्षभरात या मार्गिकेच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराच्या चढणीवरही मोठय़ा प्रमाणात बेकायदा झोपडय़ा उभारल्या आहेत. या झोपडय़ांना वीजपुरवठाही उपलब्ध झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here