शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर घणाघाती शब्दांत हल्लाबोल केला. राज्यावरील दुष्काळाचं सावट, पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर, राज्य आणि केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा कारभार आणि राम मंदिर अशा धगधगत्या मुद्द्यांवरून उद्धव यांनी निशाणा साधला. शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा हा एक विचारांचं सोनं पेरणारा सणच बनला आहे. यंदाचे मेळाव्याचे ५२वे वर्ष आहे. याचा संदर्भ देत उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. शिवसेनेचे स्थानिक विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी उद्धव यांना श्रीरामाची मूर्ती भेट दिली. तो धागा पकडून रावणदहनाकडे बोट दाखवत भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव यांनी राम मंदिरावरून भाजपला टोला हाणला. दरवर्षी देशात रावण उभा राहतो पण राम मंदिर काही उभे राहत नाही, असे उद्धव म्हणाले.उद्धव यांनी आपण २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार, अशी घोषणा केली. जे प्रश्न मी येथून विचारत आहे तेच प्रश्न मी अयोध्येत जाऊन पंतप्रधान मोदींना विचारणार आहे. आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका. त्या आशेवर पाणी टाकू नका. ते पाणी पडले तरी त्याचा लाव्हा व्हायला आणि त्यात तुम्ही भस्म व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उद्धव यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here