राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आज पासून ९ ऑक्टोबर २०१८ पर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यात आणि ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. ७१ हजार २९७ शोधपथकांच्या सहाय्याने १४ दिवसात सुमारे साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. या अभियानाबाबत अधिक माहिती देतांना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजारी ०.८० पेक्षा जास्त असलेल्या २२ जिल्ह्यामध्ये शोध मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक ‘आशा’ कार्यकर्ती आणि एक पुरुष स्वयंसेवक यांचे पथक तयार करुन ४ कोटी ५९लाख २९ हजार ६६१ लोकांची प्रत्यक्ष तपासणी केली. त्यामध्ये १ लाख ६४ हजार ९६४ संशयीत रुग्ण शोधण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.२०१६-१७ मध्ये १६ जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात आली. त्यात ४१३४ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले. त्यांना उपचार देऊन रोगमुक्त करण्यात आले. २०१५-१६ मध्येही पाच जिल्ह्यात शोध मोहीम राबवून १६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा प्रगती योजनेत समाविष्ट केला आहे. त्या अनुषंगाने देशात विविध मोहिमा राबवून कुष्ठरूग्ण शोधून त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना रोगमुक्त केले जात आहे.  समाजात लपून राहिलेले कुष्ठरुग्ण शोधून काढून उपचाराखाली आणण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here